ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबईत ईस्टन फ्री वे वर टॅक्सीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सहा जण ठार झाले आहेत. टॅक्सीचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीन जण या अपघातात जखमी झाले आहेत.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी टॅक्सीमध्ये भरल्यामुळे हा अपघात झाला.गुजरातहुन आलेले कुटुंब सँट्रो टॅक्सीने मुंबादेवीच्या दर्शनाला निघालेले असताना हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये २ लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. टॅक्सीमधून पाचजण प्रवास करतात पण अपघातग्रस्त टॅक्सीमध्ये नऊजण होते. वाडीबंदर परिसरात हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सँट्रो टॅक्सीचा चालक कुटुंबाला ओळखत होता. त्याने दादर येथून ८ जणांना दाटीवाटीने गाडीत कोंबले होते. फ्रीवेच्या सिग्नलने खाली उतरत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. या भीषण अपघातात सहा जणाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली.
मृतांची नावे :
राजकुमार वर्मा (८) , अंतरा वर्मा (३५), हरकेश वर्मा (४५), राजश्री वर्मा (३५), रागिणी वर्मा (२०), आशा वर्मा (१२)
जखमींची नावे : विनय वर्मा (२१) , रवी वर्मा (१४)
Maharashtra: 6 died & 3 injured after a taxi turned turtle in Dongri area of Mumbai— ANI (@ANI_news) November 5, 2016