मुंबई : किडनीसाठी तब्बल २१ लाखांचा सौदा झाला असल्याचे ब्रिजेशकिशोर जैस्वाल याने जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आला असताना माध्यमांना सांगितले. किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाने आणि डॉक्टरांनी पैसे घेतले असल्याचे जैस्वालने सांगितले. बुधवारी रेखादेवी म्हणजे शोभा ठाकूर आणि ब्रिजेशकिशोर जैस्वाल दोघांना जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. चौकशी समिती आणि पोलिसांनी डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे. किडनीदाता शोभा ठाकूर हिच्या पोटावर टाके घातले आहेत. त्यामुळे तिची किडनी काढून घेतली की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक असल्याने, बुधवारी या दोघांना जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले होते. दोघांचीही सीटी स्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी करण्यात आली आहे. हिरानंदानी रुग्णालयाने महिलेची किडनी काढण्यात आलेली नाही, असे सांगत सोनोग्राफी, सीटीस्कॅनचे अहवाल दिला होता, पण त्यांनी दिलेला अहवाल ग्राह्य धरणे योग्य नसल्याने त्यांची तपासणी शासकीय रुग्णालयातून कन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. किडनी प्रत्यारोपणासाठी २१ लाख रुपये खर्च झाल्याचे जैस्वालने सांगितले. त्यातील आठ लाख हे दोघांना दिले असल्याचेही त्याने स्पष्ट केले. या वेळी शोभाने मात्र बोलण्यास नकार दिला. त्रास होतो आहे, पोटात दुखत आहे, अशी कारणे दिली. हिरानंदानी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणात फसवणूक केली जात असल्याचे समोर आल्यावर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अवयव प्रत्यारोपण समितीनी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने बुधवारी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांची चौकशी केली. एकूण १५ जणांची चौकशी होणार असून, त्यापैकी ५ जणांची चौकशी आज करण्यात आली. रुग्ण आणि दात्या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांनी या समितीला दिली आहेत. या कागदपत्रांचीदेखील तपासणी केली जाईल, असे आरोग्य सेवा संचालनालयाच्या सह संचालक डॉ. गौरी राठोड यांनी सांगितले, तर पवई पोलिसांनी बुधवारपासून हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांची कसून चौकशी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)>प्रत्यारोपणाची तयारी झाली होती पूर्णहिरानंदानी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी जे.जे. रुग्णालयातील चौकशीनंतर शोभा ठाकूर हिच्या किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झालेली होती, अशी माहिती समोर आली आहे. तिच्या बरगड्यांवरील खुणांमुळे हे स्पष्ट झाल्याचे जे.जे.च्या अहवालात समोर आले. पोलीस पोहोचल्याने शस्त्रक्रिया थांबवण्यात आली. सध्या तिच्या दोन्ही किडन्या शाबूत आहेत.
तब्बल २१ लाखांचा सौदा
By admin | Published: July 21, 2016 5:31 AM