लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील नागरिक व विकासकांमार्फत करण्यात येणाऱ्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात डेब्रीज निर्माण होते. परिणामी आरोग्याला निर्माण होणारा धोका पाहता पर्यावरण दिनाचे निमित्त साधत सोमवारी केडीएमसीने डेब्रीजमुक्त रस्ते व पदपथ अभियान सुरू केले. त्यासाठी एजन्सी नियुक्ती करून १८००२३३००४५ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. शहरात ठिकठिकाणी डेब्रीजचे ढीग पाहायला मिळतात. या डेब्रीजची विल्हेवाट लावली जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होते. त्यामुळे आजार बळवतात. आता महापालिकाच डेब्रीज वाहून नेणार आहे. त्यासाठी वरील क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधून शहर स्वच्छता अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी येथील कार्यक्रमात केले. पर्यावरण दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महापौर देवळेकर, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, विरोधीपक्षनेते प्रकाश भोईर, सभागृहनेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. डेब्रीज उचलण्यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केल्यानंतर महापौरांनी हॉटेल वेस्ट करता स्वतंत्र आर. सी. गाड्यांचे लोकार्पण केले. या वेळी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अजीत शेट्टी उपस्थित होते. हॉटेल असोसिएशनच्या सहकार्याने बायोगॅस प्रक्रियेला लागणारा ओला कचरा संकलित करून केडीएमसीला दिला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत महापालिका विभागीय कार्यालयाच्या आवारात वायू व ध्वनिच्या प्रदूषणाची पातळीही मोजण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नागरिकांनीही शहर स्वच्छता अभियानात योगदान द्यावे, असे आवाहन देवळेकर यांनी केले. या वेळी पावसाळी आपत्ती व्यवस्थापन संपर्क पुस्तिका २०१७ चे अनावरण करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने डेब्रीज टाकण्यासाठी वेगवेगळ््या भागांमध्ये जागा निश्चित केल्या आहेत. बहुतांश जागा या आरक्षित भूखंडाच्या आहेत. विशेष करून उद्याने, मैदानाचे हे भूखंड आहेत. ताब्यात आलेल्या या आरक्षित जागांच्या सपाटीकरणासाठी डेब्रीजचा उपयोग केला जाणार आहे. रस्त्यावरील डेब्रीज उचलण्याबरोबरच पदपथ, मॅनहोल वरची तुटलेली, गहाळ झालेली कव्हर्स बदलणे, तुटलेले स्लॅब ड्रेन व पदपथाच्या काँक्रिट स्लॅबची दुरुस्ती करणे, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स व आवश्यकतेनुसार सूचनाफलक लावणे, वाहतूक सुविधांसाठी साइन बोर्ड बसवणे, सूचनाफलक लावणे, थर्माेप्लॅस्टिक पेंटींग करणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदणे, पदपथ व साइडपट्टीचे पेव्हर ब्लॉक दुरुस्ती, झाडे तोडणे व गवत कापणे ही कामे देखिल एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचा आढावापर्यारवरण दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. या योजनेंतर्गत सुरू असलेले बायोगॅस प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ७९ नाल्यांची सफाई पूर्ण : आतापर्यंत महापालिकाक्षेत्रातील ८९ नाल्यांपैकी ७९ नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता बबन बरफ यांनी या वेळी दिली. तर पाणीपुरवठा विभागामार्फत दररोज पाणी नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. या नमुन्यांची संख्या सरासरी २७० असल्याचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले.
केडीएमसी मोफत उचलणार डेब्रीज
By admin | Published: June 07, 2017 4:13 AM