पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आली असल्याने इच्छुकांकडून निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही सगळी आगामी निवडणुकीची तयारी असली, तरी सामान्यांची दिवाळी मात्र यातून यंदा गोड झाली. फराळाचे जिन्नस, उटणे असे पदार्थ घरोघर पाठवून प्रबळ इच्छुकांनी व तिकिटाची खात्री असलेल्या उमेदवारांनी आपले नाव पोचविण्याचा प्रयत्न केला. गरजूंची दिवाळी त्यामुळे होऊन गेली. दिवाळीच्या काळात शहरातील विविध राजकीय नेत्यांकडून नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. ‘दिवाळी पहाट’च्या माध्यमातून सुरांची मेजवानी दिली जाते. यंदाच्या वर्षी दिवाळी पहाटचे प्रमाण विशेषत्वाने वाढले होते. छोट्या-छोट्या उद्यानांतही दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यात आले. यातून अभिरूचीसंपन्न रसिक मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तर दिवाळी संरजामाच्या वाटपातून सर्वसामान्य नोकरदार, मध्यमवर्गीय, तसेच गरीब मतदारांना जवळ करण्यात आले. उटण्यापासून आकाशकंदील आणि साबणापर्यंत व रांगोळीपासून ते फराळाच्या पदार्थांपर्यंत संरजाम असलेल्या पिशव्या प्रभागांमधून वाटण्यात येत होत्या. त्यावर अर्थातच उमेदवाराचे नाव, शक्य असेल तर छायाचित्रही असेल, याची काळजी घेतलेली दिसत होती. एका इच्छुक उमेदवाराने तर संरजामासोबत दिलेल्या अत्तराच्या छोट्या बाटलीभोवतीही आपल्या नावाचे रॅपर गुंडाळले होते. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांसोबतच व्यावसायिकांचीही मदत घेण्यात आली. प्रामुख्याने महिला कार्यकर्त्यांची फळी यासाठी वापरण्यात आली. अनेकांच्या घरी संरजामाची चार ते पाच पॅकेट्स आली होती. एकाच प्रभागातील वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी वाटप केल्यामुळे असा प्रकार झाला. त्यामुळे यंदा आम्हाला साबण, उटणे, पणत्या विकत घ्याव्याच लागल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. महिनाअखेरीस सण आल्याने आणि बोनसपासून वंचित असल्याने ज्या घरांमध्ये खरोखर दिवाळीविषयी प्रश्नचिन्ह होते, त्यांना इच्छुकांच्या या भेटींमुळे काहीसा दिलासा मिळाला. मध्यमवर्गीयांनी मात्र जरा उशिरानेच हाती आलेले (व हजारोंच्या पटीत वाटल्या जाणाऱ्या या जिन्नसांच्या दर्जाविषयी प्रश्न असल्याने)हे जिन्नस इतर गरजूंना दिल्याने ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ या म्हणीचा प्रत्यय आला.(प्रतिनिधी)>मतदारांपुढे प्रश्न : पणत्या, रांगोळीचे करायचे काय ?महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या इच्छुकांनी, तसेच विद्यमान माननीयांनी सर्वसामान्यांना दिवाळी सरंजाम घरपोच दिला़ प्रभाग मोठा झाला असला, तरी प्रत्येकाने आपले बलस्थान असलेल्या भागातील सर्वांपर्यंत हा सरंजाम पोहोचेल, तसेच नव्याने जोडलेल्या भागातील लोकांपर्यंत आपले नाव पोहोचावे, यासाठी मोठी धडपड केली़ त्यामुळे अनेक घरांमध्ये दोघा, तिघा इच्छुकांनी दिलेला सरंजाम पोहोचला़ दिवाळीच्या अगोदर हा सरंजाम पोहचला, तरी पणत्या व रांगोळीला मर्यादा असल्याने आता त्यांचे काय करायचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे़ झोपडपट्टी, तसेच चाळीवजा घरात पणत्या लावायला तसेच रांगोळी काढायला मर्यादित जागा राहिली आहे़ इमारतींमध्ये तर सर्वांची दारे एकमेकांसमोर त्यामुळे दारासमोर छोट्याशा जागेत रांगोळी काढली जाते़ अनेकांना अशा काही भेटवस्तू मिळेल, याची कल्पना नसल्याने लोकांनी अगोदरच त्याची खरेदी केली होती़ शिवाय रांगोळी, पणत्या या तशा कमी खर्चाच्या असल्या, तरी महिलांना आपल्या पसंतीने घेण्याची सवय असल्याने त्यांनी त्या अगोदरच खरेदी केल्या होत्या़ त्यामुळे एकेका घरात या सरंजामाचे अनेक पाकिटे आली़ आता दिवाळी संपल्याने या पणत्या, रांगोळ्यांचे करायचे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे़ >मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नमहापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांच्या राजकीय इच्छांचे प्रदर्शन फ्लेक्स, होर्डिंंग यांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुकांकडून अर्ज मागविणे, मुलाखती हे सोपस्कार अद्याप व्हायचे आहेत. उमेदवारीही निश्चित व्हायची आहे. मात्र, त्याअगोदरच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपला उमेदवारीचा दावा आणखी प्रबळ करण्यासाठी नागरिकांना हे वाटप करण्यात आले. आचारसंहितेचा बागूलबुवा नसल्यानेही याला जोर आला होता.>सॅपलचाही समावेशदिवाळीच्या या सरंजामात पणत्या, रांगोळी, उटणे, साबण, सुगंधी तेल याबरोबरच अत्तराची बाटलीही दिली होती़ काही जणांनी अत्तराच्या या छोट्याशा बाटलीवरही आपली जाहिरात करणारी पट्टी लावली होती, तर काही जणांनी चक्क कंपन्यांकडून सॅपल म्हणून दिल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचेही वाटप या सरंजामातून करत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला़
सामान्यांची दिवाळी गोड!
By admin | Published: November 02, 2016 12:57 AM