मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच नेत्यांची जोरदार तयारी असून महायुती देखील प्रचाराला लागली आहे. निवडणूकीपूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दर महिनेला दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. हा 'चुनावी जुमला' असल्याची टीका विरोधकांनी केली होती. आता मात्र भाजप आमदाराने याबाबत कबुली दिली आहे.
काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले आहे. जाहीर सभेमध्ये त्यांनी केलेले हे वक्तव्य गाजत असून व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा आधार घेत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे. महायुतीला मतांचा दुष्काळ असल्यानं लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे, हे भाजप आमदाराने मान्य केल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले? आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीला टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार यांनी लिहिले आहे की, अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये ?सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विधान केले. ते म्हणाले की, आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली, तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरापुढे मतदानाची पेटी येईल. त्यावेळी या माझ्या लाडक्या बहिणी कमळाला मत देतील, यासाठी आम्ही हे जुगाड केलंय. हे सर्वजण खोटं बोलले असतील. मात्र, मी खरं बोलतो. माझं बोलणं खरं आहे की नाही? नाहीतर बोलायचं एक आणि करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का?, असे विधान भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केले आहे.