मुंबई : एसटीच्या कर्मचाऱ्यांना वाढीव ६ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे ११३ टक्के दराने नवीन महागाई भत्त्याची अंमलबजावणी आॅक्टोबर २0१५पासून नियमित वेतनापासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर महिन्याला ६ कोटींचा तर वर्षाला ७२ कोटींचा बोजा पडेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या वाढीव महागाई भत्त्याच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी होती. सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना १0७ टक्के महागाई भत्ता दिला जातो. या बैठकीत ६ टक्के वाढीव महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णयानुसार राज्य शासनाने १ जानेवारी २0१५पासून मूळ वेतनावर असणाऱ्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ केलेली आहे. त्यानुसार महागाई भत्त्याचा दर १ जानेवारी २0१५पासून १0७ टक्क्यांऐवजी ११३ टक्के झाल्याचे आणि त्याची अंमलबजावणी एसटी कर्मचाऱ्यांसाठीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव सहा टक्के महागाई भत्ता
By admin | Published: October 26, 2015 2:14 AM