- विशेष धोरण आखण्याची मागणी
मुंबई : मेळघाटात गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे उपजतमृत्यूंसह ११९ पालकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते अॅड. बंड्या साने यांनी दिली आहे. तरी सरकारने कुपोषणासाठी विशेष धोरण आखण्याची मागणी साने यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.साने म्हणाले की, मेळघाटात आरोग्य केंद्रांची वानवा असून उपलब्ध केंद्रातही पुरेसे डॉक्टर नाहीत. परिणामी २०१५-१६ सालात मेळघाटात कुपोषणामुळे ५२८ बालकांना जीव गमवावा लागला. यामधील उपजत मृत्यूंची संख्या १००हून जास्त आहे. एप्रिल ते जून महिन्यांत १० मातामृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मेळघाटातील कुपोषणमुक्तीसाठी शासनाने तातडीने उपाययोजना आखण्याची गरज आहे. मात्र अद्यापही येथील कुपोषणप्रश्नी सरकार म्हणावे तितके गंभीर नसल्याचे साने यांचे म्हणणे आहे.१९९३ साली विरोधी बाकावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेळघाटात जाऊन कुपोषणाची माहिती घेतली होती. प्रश्नाची गंभीरता जाणल्यानंतर फडणवीस यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात सरकारविरोधात याचिकाही दाखल केली. मात्र युतीचे सरकार आल्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा युती सरकारचा सत्तेवरून पायउतार झाला आणि भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आत्तापर्यंत भाजपने कुपोषणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात दोनवेळा याचिका दाखल केली. मात्र गेल्या वीस वर्षांपासून या प्रश्नावर बाजू मांडणारे भाजपचे वकील आत्ता छत्तीसगड महाधिवक्ता म्हणून काम करत आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांत ते याप्रकरणी होणाऱ्या सुनावणीस सतत गैरहजर राहत आहेत. सत्तेत नसताना कुपोषणाचे राजकारण करत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्यानंतर मात्र चिडीचुप दिसतअसल्याचे त्यांनी सांगितले.मेळघाटाला दिलासा मिळणार का?राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आत्तापर्यंत मेळघाटाला तीनवेळा भेट दिली. मात्र तरीही येथील कुपोषणाचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण आहे. याउलट केसरकर यांच्या भेटीनंतर येथील टेलिमेडिसन सेवा बंद झाल्याचे साने यांचे म्हणणे आहे.एकंदरीतच कुपोषणाच्या प्रश्नावर विरोधी बाकावर असतानाही दाखवली जाणारी तळमळ, सत्तेवर आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवावी. तसेच विशेष धोरण आखून येथील कुपोषण निर्मूलनाचा ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणीही साने यांनी केली आहे.