नवी मुंबई : दहीहंडीचा सराव करताना पडून जखमी झालेल्या किरण तळेकर (वय 12) या बालगोविंदाचा मृत्यू झाला आहे. सानपाडा येथे ही घटना घडली असून, यामुळे बालगोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सानपाडा सेक्टर 5मध्ये राहणारा किरण तळेकर हा पाचवीमध्ये शिकत होता. एक महिन्यापूर्वीच तो कुटुंबीयांसोबत या परिसरात राहण्यास आला. येथील लहान मुलांनी एकत्र जमून गोविंदा पथकाची तयारी चालवली होती. सानपाडा सेक्टर 1क् येथील मैदानावर ही सर्व लहान मुले दहीहंडी फोडण्याचा सराव करत होती. 3 ऑगस्ट रोजी सरावादरम्यान किरण हा थरावर चढला असता पडून त्याला दुखापत झाली होती.
परंतु दहीहंडीच्या सरावादरम्यान पडून दुखापत झाल्याची बाब त्याने घरच्यांपासून लपवली. अखेर शुक्रवारी रात्री त्याला त्रस होऊ लागल्याने त्याला नेरूळच्या तेरणा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु या वेळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी तत्काळ इतर रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, तेरणा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महापालिकेच्या डॉक्टरांशी संपर्क करून आयसीयूमध्ये जागा आहे का? यासंबंधीची चौकशीही केली. परंतु महापालिका रुग्णालयात जागा नव्हती. त्यामुळे किरणच्या कुटुंबीयांनी त्याला घरी आणले होते. अखेर शनिवारी सकाळी त्याला अधिक त्रस जाणवू लागला असता त्याला पालिका रुग्णालयात नेण्यात आले. परंतु या वेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किरणच्या शवविच्छेदन अहवाल पालिका रुग्णालयाने राखून ठेवला. सरावादरम्यान तो आजारीही होता. त्याला उलटय़ा आणि ताप याचाही त्रस होत होता. त्यामुळे किरणचा मृत्यू नक्की कशाने झाला हे कळू शकलेले नाही. त्याकरिता हा अहवाल कलिना येथे तपासणीकरिता पाठवला जाणार आहे. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)
त्रस होऊ लागल्याने किरणला नेरूळच्या तेरणा रुग्णालयात नेले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी तुम्हाला खर्च परवडणार नाही असे सांगून पालिका रुग्णालयात जायला सांगितल्याचे मयत किरण याचे वडील गोविंद तळेकर यांचे म्हणणो आहे. त्यामुळे त्याला घरी आणले. त्याला सकाळी अधिक त्रस झाला. किरणच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
13 वर्षाचा हुकमी एक्का
बालहक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदांवर घातलेली बंदी, उच्च न्यायालयाने थरांच्या उंचीसंदर्भात दिलेले आदेश आणि दहीहंडी समन्वय समितीने घेतलेला निर्णय अशी ‘त्रिशंकू’ अवस्था असतानाही शहर-उपनगरांतील सार्वजनिक गोविंदा पथकांनी मात्र हुकमी एक्का ‘तेरा’चाच, असे म्हणत हालचाली सुरू केल्या आहेत.
दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे शहरातील नामांकित गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी तेरा वर्षाच्या बालगोविंदाला सरावात दाखल केले आहे. त्यामुळे आता तेरा वर्षाच्या बालगोविंदांनाच घेऊनच नियमित सराव सुरू असल्याचे चित्र ब:याच ठिकाणी दिसून येते आहे.
बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्णयाला विरोध करीत गोविंदा पथकांनी बालगोविंदांना थरांवर चढविल्यास त्याबद्दल बालगोविंदांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यानंतर थरांवर चढताना त्या गोविंदांना काही दुखापत झाल्यास थेट आयोजकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. त्यामुळे या परिणामांची काहीशी जाणीव सार्वजनिक गोविंदा पथकांना झाल्यामुळे ही पथके तेरा वर्षाच्या बालगोविंदाकडून जोमाने सराव करून घेत आहेत.