ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 16 - चलनातून रद्द झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरील रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिगंबर कसबे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते 70 वर्षांचे होते.
दिगंबर कसबे हे मूळचे बळीरामपूरचे रहिवासी होते, नोटा बदलण्यासाठी ते तुप्पा इथल्या 'बँक ऑफ इंडिया'च्या शाखेत आले होते. बँकेबाहेर लागलेल्या रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कसबे यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोब्हेंबर रोजी चलनातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याची घोषणा करुन जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे आवाहन केले. यानंतर बँक, एटीएम सेंटरबाहेर नोटा बदलण्यासाठी, पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत असून भर उन्हात बँकाबाहेर, एटीएमबाहेर नागरिक रांगा लावत असल्याने त्यांना शारीरिक त्रासदेखील होत आहे.
काही दिवसांपूर्वी, नोटा बदलण्यासाठी गेलेल्या मुलुंडमधील 73 वर्षीय वृद्ध व्यक्तीचादेखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केल्याने विश्वनाथ वर्तक घाबरुन गेले होते, नोटबंदीमुळे ते चिंतित होते. अशातच नोटा बदलण्यासाठी गेलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यांचा मृत्यू झाला.