बुलडाणा, दि. ४ : चिखली तालुक्यातील डोंगरशेवली शिवारातील एका शेतात काम करीत असलेल्या आजोबा व नातवावर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात वृद्ध शेतकरी मोहम्मद शाह बिबिन शाह (वय ६५) यांचा मृत्यू झाला, तर नातू आमीन शाह यासीन शाह (वय १0) हा गंभीर जखमी झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान घडली. या घटनेतील जखमी अमिन शाह याच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे डोंगरशेवली शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलडाणा तालुक्यातील डोंगरशेवली येथील वृद्ध शेतकरी मोहम्मद शाह बिबिन शाह हे आपल्या दहा वर्षीय नातू आमीन शाह यासीन शाह याला घेऊन शेतात काम करायला गेले होते. दुपारदरम्यान या दोघांवरही अचानक अस्वलाने हल्ला केला. यात मोहम्मद शाह बिबिन शाह (वय ६५) यांचा मृत्यू झाला, तर नातू आमीन शाह यासीन शाह (वय १0) हा गंभीर जखमी झाला. यावेळी जखमी आमीन याने आवाज देऊन परिसरातील लोकांना जमा केले. त्यावेळी वृद्ध मोहम्मद शाह याचा मृतदेह शेतात पडून होता. शिवाय येथे अस्वलही उभे होते. ग्रामस्थांनी तेथून अस्वलाला हाकलून लावले. यानंतर गंभीर जखमी आमीन याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तत्काळ औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले. यावेळी आरएफओ झोळे यांनी आमीनच्या उपचारार्थ नगदी १0 हजारांची मदत उपलब्ध करुन दिली, तर वनविभागाच्या दुसर्या पथकाने डोंगरशेवली येथे घटनास्थळावर पंचनामा करुन वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.चार महिन्यांत तिसरी घटना चिखली तालुक्यातील डोंगरशेवली, करवंड हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे बर्याचवेळा वन्य जीव लोकवस्तीमध्ये प्रवेश करतात. गत महिन्यात करवंड वनपरिक्षेत्रात दोन अस्वलाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. दुसर्या घटनेत एक जखमी झाला होतो. यानंतर वनविभागाने अस्वलाला पकडून अंबाबरवा अभयारण्यात सोडले होते. आता डोंगरशेवली येथे पुन्हा अस्वलाने हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
By admin | Published: September 05, 2016 1:02 AM