ऑनलाइन लोकमतउल्हासनगर, दि. 16 - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनगर वॉर्ड नं. 1 येथील लक्ष्मीनगर येथे टेकडीवरील घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत चार जण जखमी आहेत. सैफुद्दीन खान आणि इस्लाम शेख हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत. शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, मागील दोन दिवसांपासून विदर्भातही पाऊसधारा सुरू झाल्या असून गडचिरोलीत अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरींवर सरी पडत आहेत. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार कायम आहे. मध्य, उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. मराठवाड्यात पाऊस नसला तरी जायकवाडीतील नाथसागरात पाणीसाठा होऊ लागला आहे. मुंबई शहरासह उपनगरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. मुंबईकरांची तहान भागविणारा मोडक सागर तलाव भरुन वाहू लागला आहे. माळशेज घाटात दरडी कोसळत असल्याने पुढील दोन दिवस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून राधानगरीसह पाच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटांपर्यंत गेली असून, आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात संततधार सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. कोकणात मात्र पावसाचा जोर किंचित कमी झाला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 आणि 18 जुलै रोजीही सर्वदूर मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस येथील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवरही बंदी घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.