ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - लोकलची धडक लागून मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केल्याने मध्यरेल्वे मार्गावरील सीएसटी ते भायखळया दरम्यान रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.
गौरव व्होरा या १३ वर्षाच्या मुलाचा सॅंण्डर्हस्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून मृत्यू झाला. हा मुलगा शाळेतून घरी येत होता. अपघातानंतर या मुलाला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या मुलाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर इथली स्थानिक जनता मोठया संख्येने रुळावर उतरली व त्यांनी रेल्वे ब्रिजच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
रेल्वे ब्रिज नसल्यामुळे इथे रहाणा-या स्थानिक नागरीकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. इथले स्थानिक नागरीक अनेक वर्षांपासून रेल्वे ब्रिजची मागणी करत आहेत. सँडहर्स्ट रोड स्थानकात झालेला हा पहिला अपघात नाही.
यापूर्वीही अनेकांना रेल्वेब्रिज अभावी रेल्वे रुळ ओलांडताना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळेच संपप्त झालेल्या स्थानिक जनतेने रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन सुरु केले. आंदोलन करणा-यांना रुळावरुन हटवण्यात आल्याची माहिती आहे.