खुलताबाद (जि. औरंगाबाद) : सुलीभंजन येथील अल इरफान निवासी शाळेत मंगळवारी दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या शेख अफरोज शेख अमीन याचा मृत्यू चक्कर आल्याने नव्हे, तर वर्गमित्राने केलेल्या मारहाणीत झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले़ त्यामुळे मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या एका विद्यार्थ्याविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अफरोजचे वडील शेख अमीन शेख मन्नुलाल (रा. रबाळे, ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि़१२) रोजी दुपारी ५ वाजता अल इरफान शाळेतून फोन आला. त्यांनी सांगितले की, तुमचा मुलगा अफरोजला शाळेत चक्कर आली आहे़ यानंतर फोन बंद झाला़ रात्री उशिरा खुलताबादला ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर अफरोज मृत झालेला आढळून आला़ मुलाचा मृत्यू हा संशयास्पद वाटल्याने त्यांनी बुधवारी सकाळी अल इरफान शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले़ तेव्हा अफरोजला एक वर्गमित्र लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना तो जमिनीवर बेशुद्ध पडल्याचे दिसून आले़ त्यामुळे अफरोजचा मृत्यू चक्कर येऊन नव्हे, तर मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले़ या घटनेला शाळा व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ खुलताबाद पोलीस ठाण्याचे पो़नि़ शिवलाल पुरभे, उपनिरीक्षक डी.जे.राजपूत यांनी या प्रकरणी अफरोजच्या एका वर्गमित्राविरुद्ध, तसेच शाळेच्या बेजबाबदार कारभारामुळे बळी गेल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)
वर्गमित्राच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू?
By admin | Published: January 14, 2016 12:32 AM