लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळविलेल्या ‘वळू’ ने रविवारी एक्झिट घेतली. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या ‘वळू’ चित्रपटातून ‘डुरक्याने’ संपूर्ण महाराष्ट्रात धमाल केली होती. सांगलीतील पांजरपोळमधील या तीनशे किलो वजनाच्या बैलाचे निधन झाल्याने अनेकांना हळहळ वाटली.२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ चित्रपटातील डुरक्या अफाट लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळविले आहेत. तब्बल तीनशे किलो वजन, लालसर डोळे, जाडजूड शिंगे अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतील पांजरपोळ येथील होता. तब्बल तीनशे वळूंमधून दिग्दर्शकाने त्याची निवड केली होती.काही दिवसांपासून आजारपणामुळे त्याने खाणे-पिणे सोडले होते. त्यामुळे त्याचे वजन दोनशे किलोपर्यंत घटले होते. वृद्ध झाल्याने उपचारास साथ मिळत नव्हती. अखेर रविवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती येथील डॉ. उद्धव धायगुडे यांनी दिली.
‘डुरक्या’चा मृत्यू
By admin | Published: June 26, 2017 2:28 AM