सोलापूर : सोलापूर महानगर पालिका परिवहन (एसएमटी)खात्यातील बस चालक महमदपीर बाबासो मुल्ला यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील चार महिन्यांपासून पगार न झाल्याने उपचारासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मुल्ला यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.एसएमटी कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून थकले आहे. आता पाचवा महिना भरत आला आहे. वेतन मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन प्रभारी परिवहन व्यवस्थापक श्रीकांत मायकलवार यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर मुल्ला यांचा मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुल्ला यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र तेथील उपचाराचा खर्च पेलत नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालायत उपचार करण्याचे ठरवले. पण खाजगी रुग्णालयातले बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसी रक्कम नव्हती. मागील चार महिन्यांपासून थकीत असलेला पगार मिळवण्यांसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे कुटुंबियांनी हेलपाटे मारले. मात्र मनपा आयुक्तासह इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. त्यांच्या नातेवाईक़ांनी कसेबसे बील भरले आणि पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालायत दाखल केले होते. (प्रतिनिधी)
एसएमटी बसचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By admin | Published: January 19, 2017 5:19 AM