ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर,दि.17 - कळंबा मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या वडिलांची चाळीस वर्षांनी सुटका झाल्याच्या आनंदाच्या भरात गळाभेट होताच हृदयविकाराच्या धक्क्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. साजिद हासम मकवाना (वय ३०, रा. अंधेरी-मुंबई) असे त्याचे नाव आहे.
हासम महमद मकवाना हा मुंबईतील एका खुनाच्या गुन्ह्यात तो पुणे येरवडा कारागृहात होता. २०१५ पासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. गेली चाळीस वर्ष तो शिक्षा भोगत असल्याने मंगळवारी त्याची जन्मठेपेची शिक्षेची मुदत संपली होती. त्यामुळे त्याला घरी घेऊन जाण्यासाठी त्याचा मुलगा साजिद व पत्नी दोघेजण आले आहेत. कारागृह प्रशासनाची कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते तिघेजण बाहेर पडले. वडिलांना पाहून साजिदचे डोळे भरून आले.
गळाभेट घेतल्यानंतर अचानक साजिदला अस्वस्थ वाटू लागले. त्याला रिक्षाने खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू पाहून आई-वडिलांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. साजिद याचे अंधेरी-मुंबई येथे मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे. चाळीस वर्षांनी पत्नी व मुलाच्या सहवासात रममाण होण्यापूर्वीच मुलाच्या आकस्मित मृत्यूमुळे हासम मकवाना यांना मानसिक धक्का बसला आहे. रात्री उशिरा सीपीआरमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह मुंबईला घेऊन गेले.