ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - 28 जानेवारी रोजी जम्मू काश्मीरच्या माछिलमध्ये हिमस्खलनातून बर्फाखाली अडकलेल्या आणि त्यानंतर सुटका केलेल्या पाच जवानांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या जवानांचे पार्थिव उद्या त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे. मृत्यू पावलेल्या पाच जवानांमध्ये तीन जण महाराष्ट्रातील आहेत. यामधील एक जवान सांगली जिल्ह्यातील आहे. त्यांचे नाव रामचंद्र माने असे आहे.
28 जानेवारीला माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलन झाले होते. त्यानंतर त्या जवानांवर माछिल भागातील लष्करी तळावर उपचार सुरू होते. पुढील उपचारांसाठी या जवानांना श्रीनगरला हलवण्यात आले होते. मात्र आज या जवानांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली.काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषेवर असणाऱ्या कुपवाडा जिल्ह्यात लष्करी छावणीजवळ झालेल्या हिमस्खलनात 5 जवान अडकले होते. सतत होणाऱ्या हिमस्खलनामुळे लष्करी छावणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले. काश्मीर खोऱ्यातील डोंगरी भागात प्रशासनाने हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग वाहतूक योग्य बनविण्याचे काम विस्कळीत झाले आहे. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून तो वाहतूक योग्य बनविण्यासाठी बीआरओची पथके झटत आहेत.