ऑनलाइन लोकमत
मालेगाव, दि. १२ - गुटख्याची पिचकारी वीजेच्या तारेवर मारणे तरूणाच्या जीवावर बेतले असून वीजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावात घडली आहे. मोहम्मद यासिन मोहम्मद सलीम असे त्या तरूणाचे नाव असून तो अवघा २१ वर्षांचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा काल (रविवार) अब्दुल खालिक पार्कजवळ त्याच्या भावाला भेटण्यासाठी गेला होता. त्याचा भाऊ मोहम्मद अमिन हा गफर अब्दुल हनिफ यांच्या कापड कारखान्यात कामाला आहे. या दुमजली इमारतीच्या वरच्या मदल्यावर तो काम करत असताना मोहम्मद यासिनने त्याला भेटायला गेला व बोलता बोलता त्याने तोंडातील गुटख्याची पिकारी बाहेर टाकली. मात्र ती पिचकारी इमारतीच्या जवळून जाणा-या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पडली आणि मोहम्मद यासिन विद्युत दाबाच्या दिशेने खेचला गेला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मालेगावात गुटखा बंदी असतानाही ही घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.