नागपूर, दि. १४ - लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे जन्माला आलेल्या 'हर्लेक्विन बेबी'चा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. या बालिकेला वाचविण्यासाठी हॉस्पिटलने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु संसर्ग झाल्याने बाळ दगावल्याचे सांगण्यात येते. 'हर्लेक्विन इथायसिस' हा दुर्मिळ त्वचारोग आहे. शनिवारी या आजाराच्या बालिकेला एका महिलेने लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जन्म दिला.
रुग्णालय प्रशासन या बालिकेच्या उपचारावर विशेष लक्ष ठेवून होते. उपचाराचा संपूर्ण खर्च हॉस्पिटलने स्वत:वर घेतला होता. बाळाला बघण्याची नागपूरच्या काही बालरोग तज्ज्ञांनी इच्छा व्यक्त केली. परंतु, बाळावर निओनेटल आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याने पाहता आले नाही. सोमवार १३ जून रोजी बाळाच्या हृदयाची २-डी 'इको' चाचणी करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच बाळ दगावले. गेल्या दोन दिवसांपासून बाळाची श्वसन यंत्रणा तसेच नाडीचे ठोके सामान्य होते. हृदयाच्या इको चाचणीनंतर पुढील उपचाराची दिशा ठरविण्यात येणार होती.
दोन दिवस उपचाराला प्रतिसादही मिळत होता. त्यामुळेच शरीराला आवश्यक घटक मिळावे यासाठी नाकात नळी टाकून दूध देण्यात आले.
परंतु, संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करीत बाळ दगावल्याचे सांगण्यात आले. ही माहिती बाळाच्या वडिलांना दिली. संशोधनासाठी हे बाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या म्युझियममध्ये संग्रहित ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दोन दिवस येथील डॉ. नानोटी, डॉ. निलोफर मुजावर, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. यश बानाईत, डॉ. प्राची दीक्षित बाळावर लक्ष ठेवून होते. परंतु त्यांचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले.
(प्रतिनिधी)