ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - इंटरव्ह्यू देऊन घरी परतणा-या एका 21 वर्षीय तरुणाचा शनिवारी दुपारी जोगेश्वरी पश्चिमेला रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. साहील मिश्रा असे मृत तरुणाचे नाव आहे. नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊन साहील त्याच्या दुचाकीवरुन घरी परतत असताना हा दुर्देवी अपघात घडला. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर जात असताना साहिलच्या दुचाकीची टेम्पोबरोबर धडक झाली. त्यानंतर तोच टेम्पो साहिलच्या अंगावरुन गेला.
या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस या टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. पदवीधर असलेल्या साहिलने अंधेरी येथे जॉब इंटरव्ह्यूला जाण्यासाठी सकाळी घर सोडले होते असे त्याचे काक सुरजीत मिश्रा यांनी सांगितले. या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीय. अपघाताच्यावेळी तिथून जाणा-या काही वाहनचालकांनी सफेद रंगाच्या टेम्पोने बाईकला धडक दिल्याचे पाहिले.
आणखी वाचा
पण कोणीही टेम्पोचा नंबर लिहून घेतला नाही अशी माहिती ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली. घटनास्थळाच्या जवळपास कुठलाही कॅमेरा नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे आव्हान आहे. पोलीस आता वेर्स्टन एक्सप्रेस हायवेवरील जोगेश्वरी ते गोरेगाव पट्टयातील कॅमे-याची तपासणी करतील त्यातून त्यांना एखादा दुवा मिळू शकतो. अज्ञात टेम्पो चालका विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.