ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २५ : सोमवारी सकाळी वाशिम जिल्ह्यातील कवरदरी शिवारात आजारी अवस्थेत आढळलेले बिबट दुपारी चारच्या सुमारास अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत पावले. उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूंची लागण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्यावर उपचार करीत असलेल्या डॉ. फरिन फानी यांनी ह्यलोकमतह्णला दिली.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रेंजमधील कवरदरी शिवारात सोमवारी सकाळी आजारी अवस्थेत एक बिबट आढळून आले. त्यास दुपारी १२.३0 वाजता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. ग्लानी अवस्थेत असलेल्या बिबट्यावर तत्काळा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. फरिन फानी, डॉ. किशोर पजई, डॉ. सुचित्रा सूर्यवंशी व डॉ. राऊळकर यांनी उपचार सुरू केले. शरीरावर कुठल्याही जखमा नसलेल्या या बिबट्यास प्रारंभी सलाइन लावण्यात आले. दरम्यान, त्याचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले. रक्ताचा अहवाल आल्यानंतर त्यास ट्रिपॅनोसोमा या घातक आजाराच्या विषाणूंची लागण झाली असल्याची माहिती मिळाली. ग्लानी अवस्थेतून कोमामध्ये गेलेला हा बिबट दुपारी ४.३0 च्या सुमारास मृत पावला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतर तो गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून उपाशी होता, अशी माहिती समोर आली. उपासमार सुरू असतानाच आजराची लागण झाली असल्यामुळे बिबट मरण पावले, असे डॉ. फरिन फानी ह्यलोकमतह्णशी यांनी स्पष्ट केले. शवविच्छेदनानंतर कृषी विद्यापीठाच्या परिसरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आजारी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: July 25, 2016 7:28 PM