मुंबई : अर्भक मृत्यू पाठोपाठ राज्याचा सरासरी वार्षिक बालमृत्यू दर २४ वरून २१ वर आला असून मागील वर्षापेक्षा तीन अंकांनी घट झाल्याची नोंद केंद्र शासनाच्या ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम’ (एसआरएस) २०१६ च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार केरळ, तामिळनाडू पाठोपाठ राज्याचा बालमृत्यू दर देशात कमी झाल्याचे नमूद केले आहे.रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया दरवर्षी एसआरएस अहवाल जाहीर करीत असतो. त्यामध्ये माता व अर्भक मृत्यूची देशभरातील राज्यांची आकडेवारी जाहीर करण्यात येते. जाहीर करण्यात आलेल्या २०१६ च्या या बालमृत्यू अहवालानुसार सर्वात कमी बालमृत्यू केरळमध्ये ११ एवढे झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडू (१९) व महाराष्ट्राचा (२१) क्रमांक येतो. संपूर्ण देशाचा बालमृत्यू दर हा ३९ एवढा आहे. त्यामध्ये गेल्या वर्षापेक्षा चार अंकांनी घट झाल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे २० लाख बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.उपाययोजनांचे फलितआरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करीत आहे त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले आहे. अर्भक व बाल मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. - डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री.2013 मध्ये महाराष्ट्राचा बालमृत्यू दर २६ होता. २०१४ मध्ये २३, २०१५ मध्ये २४ आणि २०१६ मध्ये तो २१ वर आला आहे. यावरून राज्याच्या बालमृत्यूच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे.
बालमृत्यू रोखण्यात यश!, महाराष्ट्रात मृत्युदरात तीन अंकांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:11 AM