ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद. दि. 2- आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. असे असले तरी आजही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अट्टाहास केला जातो.अशाच एका घटनेत एका विवाहितेला एकापाठोपाठ दोन मुली झाल्यानंतर तुला मुलगा होत नाही,असे म्हणत सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरवात केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहितेने शनिवारी सकाळी ४ आणि २ वर्ष वयाच्या चिमुकलींना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केले. या मायलेकींचा उपचार सुरू असताना रविवारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील महालपिंप्री येथे घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निता सतिश भोळे (२२) , दिव्या सतीश भोळे(४) आणि दिप्ती सतीश भोळे(२)अशी मायलेकींची नावे आहेत. पती सतीश गोविंद भोळे, सासू सुलाबाई, भाया संतोष आणि जाऊ आम्रपाली अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सतीश आणि संतोष यांना अटक केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिस आणि निताच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुकुंदवाडीतील प्र्रकाशनगर येथे माहेर असलेल्या नीताचा विवाह २१ फेब्रुवारी २०११ रोजी महालपिंप्री येथील सतीशसोबत झाला. नीताला एकापाठोपाठ दिव्या आणि दिप्ती या दोन मुली झाल्या आहेत. लग्नानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर आरोपींकडून घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरू झाला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या मुलीनंतर दोन वर्षापूर्वी तिला दुसरीही मुलगी झाल्याने आरोपींकडून तिच्या छळ अधिक वाढला. तुला मुलगा होत नाही, आम्हाला वंशाला दिवा पाहिजे, असे म्हणून आरोपींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. विशेष म्हणजे पती, सासू आणि भाया व जाऊ हे सुद्धा तिला टोमणे मारत असत. पतीसह चार जणांविरोधात गुन्हादरम्यान याप्रकरणी नीताचे वडिल गोपीनाथ मगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात नीताच्या पतीसह, भाया, सासू आणि जाऊ यांच्याविरोधात नीताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सतिश आणि संतोष भोळे यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास फौजदार ए.पी.लोखंडे करीत आहे.अखेर तिने मृत्यूला कवटाळलेत्रास अस' होत असल्याने नीताने स्वत:चे जीवन संपविण्याचे ठरवले. मात्र आपल्या पश्चात आपल्या दोन्ही चिमुकलींचे काय होईल,ही चिंता तिला सतावत होती. शेवटी तिने शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन्ही चिमुकलींना विष पाजले आणि स्वत:ही विषाची बाटली तोंडाला लावली. दोन्ही चिमुकलींना विष पाजून नीताने विष प्राशन केल्याचे समजताच भाया आणि पतीने त्यांना घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तिनही मायलेकींचा मृत्यू झाला.
विष प्राशन केलेल्या दोन चिमुकलींसह मातेचाही मृत्यू
By admin | Published: October 02, 2016 6:09 PM