मुंबई : नऊ वर्षांपूर्वी नागपूर शहरात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून नंतर तिचा दगडांनी ठेचून खून केल्याबद्दल वसंता संपत दुपारे या नराधमाला ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.नागपूरच्या सत्र न्यायालयाने वसंताला दिलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालायच्या नागपूर खंडपीठाने कायम केली होती. त्याविरुद्ध केलेले अपिलही सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये फेटाळले होते. या निकालाचा फेरविचार करण्यासाठी वसंताने केलेली याचिकाही न्या. दीपक मिश्रा, न्या. रोहिंग्टन फली नरिमन व न्या. उदय उमेश लळित यांच्या मूळ निकाल देणाऱ्या खंडपीठाने फेटाळली.हल्ली केलेल्या नव्या नियमानुसार खंडपीठाने वसंताच्या फेरविचार याचिकेवर चेंबरमध्ये नव्हे तर खुली सुनावणी घेतली. त्यानंतर दिलेल्या ३० पानी निकालपत्रात न्यायालयाने नमूद केले की, आम्ही आरोपीच्या बाजूच्या आणि विरोधातील अशा सर्व बाबींचा गांभीर्याने विचार केला. पण दिलेल्या शिक्षेत फेरबदल करावा, असे आम्हाला कोणतेही सबळ कारण दिसत नाही. खास करून वयाची पन्नाशी ओलांडलेल्या, विवाहित असलेल्या व स्वत:ची दोन मुले असलेल्या वसंताने आपली कामवासना तृप्त करण्यासाठी चार वर्षांच्या निष्पाप मुलीवर ज्या विकृतपणे बलात्कार केला व ज्या राक्षसी पद्धतीने तिचा खून केला ती समाजात भीती व चीड व्यक्त करणारी आहे.आरोपीचे कृत्य मानवी नातेसंबंधांना सुरुंग लावणारे असल्याने आरोपीस फाशीखेरीज अन्य कोणतीही शिक्षा देणे योग्य होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.तसेच आरोपीला फाशीच का द्यावी याची सबळ कारणे अभियोग पक्षाने द्यायला हवी होती. तीही त्यांनी दिली नव्हती,असे वसंताच्या वकिलाने मांडलेले मुद्दे अमान्य करण्यात आले.(विशेष प्रतिनिधी)चॉकलेटचे अमिष दाखवून नेलेवसंताच्या वासनेची शिकार ठरलेली ही निरागस मुलगी नागपूरमध्ये वाडी भागात कदगाव-कळमेश्वर रस्त्यावर कुशाल बनसोड यांच्या चाळीत राहायची. वसंता त्याच्या शेजाऱ्यांचा मित्र होता व तो नेहमी त्यांच्याकडे यायचा. ३ एप्रिल २००८ रोजी वसंता आला तेव्हा ही मुलगी घराबेहर खेळत होती. वसंताने तिला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून सायकलवर डबलसीट घेतले व तो तिला घेऊन गेला. गती गोडाऊनपाशी झाडाझुडपांमध्ये नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला व नंतर दगडांनी डोके ठेचून तिचा खून केला होता.
नराधम वसंताची फाशी पुन्हा झाली कायम
By admin | Published: May 04, 2017 3:46 AM