भिवंडी : गणेशोत्सवातील मिरवणुकीतून धुमसणाऱ्या वादातून, चार दिवसांपूर्वी भाजपा आमदाराच्या भावासह काही कार्यकर्त्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांपैकी एकाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाल्याने भिवंडीत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याने संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. त्यांनी धामणकर नाक्यावरील वाहतूक रोखून धरली. दुकाने बंद केली आणि केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या तीन गाड्या फोडल्या. यात तीन पोलीस जखमी झाले. त्यामुळे भिवंडीत दिवसभर तणाव होता. विकी दयानंद ढेपे (२०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गुरुवारी आपल्या मित्रांसह वऱ्हाळादेवीनगर येथे बौद्ध विहारासमोरील बाकड्यावर बसला होता. मध्यरात्री सव्वाच्या सुमारास मोटारसायकल आणि इनोव्हा कारमधून १५-२० जण आले. त्यांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि चॉपरने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विकी ढेपे (२०), राजेंद्र गाडेकर (१७) व सागर साठे हे तिघे गंभीर जखमी झाले होते. गाडेकर व साठे यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असून, विकी ढेपे याच्या अंगावर चॉपरचे तीन वार असल्याने त्याच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भाजपा आमदार महेश चौगुले यांचा भाऊ राजू चौगुले, आदित्य जाधव, रवी सावंत, सनी फुटाणकर, गोट्या टँकरवाला, अमित गायकर, जयेश मेस्त्री, रूपेश कोमलवार, काळ्या टी-शर्टमधील एका तरुणासह त्यांच्या १०-१२ साथीदारांविरोधात तक्रार करण्यात आली होती.गौरापाड्यातील गणपती उत्सवाच्या मिरवणुकीत सामील होण्यावरून झालेल्या भांडणातून भाजपा आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांत वाद धुमसत होता. त्यातूनच, १ मे रोजी मंडई येथे विशाल आव्हाड या तरुणाला केलेल्या मारहाणीत त्याचा पाय फॅ्रक्चर झाला होता. पोलिसांनी वेळीच कारवाई करीत, वऱ्हाळनगरच्या तरुणांवरील हल्ले न थांबवल्याने तरुणांमध्ये संताप होता. त्यातच दुपारी १ च्या सुमारास विकी ढेपे (२०) याच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरात जमाव जमला. त्यातील तरुणांनी संताप व्यक्त करताना, वऱ्हाळानगर ते धामणकर नाका परिसरातील दुकाने आणि वाहतूक रोखून धरत बंद पुकारला, तसेच आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयाच्या खाली असलेल्या महेश बँकेच्या एटीएमची काच फोडली. त्यांना रोखण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या गाड्यांवरही जमाव चाल करून आला. पोलीस एकतर्फी वागत असल्याचा आणि भाजपा आमदाराच्या भावाला पाठीशी घालत असल्याचा त्यांचा आरोप होता. जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी टी.व्ही. कुंभार, एस.एस. शेख, एस.आर. थिटे जखमी झाले. पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी शांततेचे आवाहन करीत तरुणांची समजूत काढली. (प्रतिनिधी)
भाजपा-रिपब्लिकन संघर्षात एकाचा मृत्यू
By admin | Published: May 16, 2016 2:47 AM