लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष टाडा न्यायालयात आरोपींना काय शिक्षा द्यायची, यावरून युक्तिवाद सुरू असताना सीबीआयने ताहीर मर्चंट आणि करीमुल्ला खानलाही फाशीचीच शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी विशेष टाडा न्यायालयाला केली. पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करून आणलेला अबू सालेमही फाशीच्या शिक्षेस पात्र आहे, मात्र त्यात कायदेशीर अडचणी आहेत, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला सांगितले.मुस्तफा डोसाचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी सीबीआयने दोषींना कोणती शिक्षा ठोठवायची, यासाठी विशेष न्यायालयात युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी मुस्तफा डोसा व फिरोज खान यांच्याप्रमाणे करीमुल्ला खान व ताहीर मर्चंट यांच्यासाठीही फाशीच्या शिक्षेची मागणी विशेष न्यायालयाकडे केली.करीमुल्ला दाऊद इब्राहिम व टायगर मेननच्या सतत संपर्कात होता; तर ताहीर मर्चंटनेही या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावली, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. तसेच अबू सालेमही फाशीच्या शिक्षेस पात्र आहे, मात्र कायदेशीर अडचणींमुळे त्याच्यासाठी या शिक्षेची मागणी केली जाऊ शकत नाही, असे साळवी यांनी न्यायालयाला सांगितले. सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशिद खान, करीमुल्ला खान उर्फ हुसेन हबीब शेख, ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या यांना न्यायालयाने टाडा कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या कलम १२० (ब)नुसार बॉम्बस्फोटाचा कट रचणे, तो कट अंमलात आणून शेकडो निष्पापांची हत्या करणे व हत्येचा कट रचल्याच्या मुख्य आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे व रियाझ सिद्दिकीला केवळ टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवले आहे.
अबू सालेमसाठी फाशीच योग्य, मात्र कायदेशीर अडचणी
By admin | Published: July 01, 2017 3:00 AM