तुमसर (भंडारा) : पोटात बाळ दगावल्यानंतर शस्त्रक्रिया करून बाळाला बाहेर न काढल्यामुळे आठ तासांनंतर अखेर मातेचा मृत्यू झाला. त्यानंतर, संतप्त नागरिकांनी रुग्णालयाची तोडफोड करून खापा चौकात रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडल्यामुळे जमाव संतप्त झाला. या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलिसांसह १२ जण जखमी झाले. जयश्री राजेश ठवकर (२८) रा.खापा असे मृत महिलेचे नाव आहे.या महिलेला सोमवारी सकाळी ११ वाजता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटात वेदना होत असल्यामुळे डॉ.संध्या डांगे यांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीमध्ये पोटातील बाळ दगावल्याचे दिसून आले. त्यानंतर, डॉ. डांगे यांना सोनोग्राफी रिपोर्ट दाखविण्यात आला. त्यावर डॉ डांगे यांनी सर्व व्यवस्थित असल्याचे ठवकर कुटुंबाला सांगितले. त्यानंतर, रात्री ८ वाजता जयश्रीची प्रकृती खालावली आणि त्यातच रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या वेळी तिथे उपस्थित डॉ. घोडेस्वार यांनी तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे यांना बोलाविले. तोपर्यंत रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली व त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली.त्यानंतर रुग्णालयात पोलिसांचा ताफा दाखल झाला. माजी आमदार बावनकर, माजी नगराध्यक्ष रगडे, बालकदास ठवकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी आंदोलकांची समजूत काढली व जयश्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरकडे रवाना केला. मंगळवारी संतप्त नागरिकांनी खापा चौकात रुग्णालयाविरुद्ध रास्ता रोको केले. (प्रतिनिधी)
गर्भवती महिलेचा मृत्यू
By admin | Published: August 31, 2016 5:10 AM