वाई (सातारा) : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या वाई हत्याकांडातील सहा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी वाई पालिकेतील कर्मचाऱ्यांची मदत घेतली होती. त्यांच्यातील एका सफाई कामगाराचा सोमवारी सकाळी साडेनऊला हृदयविकाराने मृत्यू झाला. सुभाष विठ्ठलराव चक्के (वय ४९) असे त्याचे नाव आहे. चक्के यांनी या प्रकरणाचा धसका घेतला होता, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, पत्नी व विवाहित दोन मुली असा परिवार आहे. सिरीयल किलर संतोष पोळ याने केलेल्या सहा खुनांतील मृतदेह पोलिसांनी वाई नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकरवी उकरुन बाहेर काढले. बराच कालावधी झाला असल्याने मृतदेहाचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले होते. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला. पालिका कर्मचारी सुभाष चक्के हेदेखील पोलिसांना मदत करण्यासाठी खोदकामावर होते. तो ताण सहन न झाल्याने ते तणावाखाली होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. चक्के हे पालिकेत गेली २४ वर्षे सफाई कामगार म्हणून काम करीत होते. (प्रतिनिधी)>सहा मृतदेहांचे सांगाडे मुंबईकडेसंतोष पोळने २००३ पासून खून केलेल्या सहाजणांच्या हाडांच्या सांगाड्यांची ओळख पटविण्यासाठी हे सांगाडे सोमवारी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. सांगाडे बाहेर काढत असताना मुंबईतील फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञांचे पथकही हजर होते. तज्ज्ञ मंडळी खड्ड्यात उतरून चाळणीने माती चाळून हाडे गोळा करत होती. हे सांगाडे नक्की कोणाचे? याची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.>मुलाला नोकरीचे आश्वासन : चक्के यांच्या मुलाला कामावर घेण्याचे लेखी आश्वासन पालिकेकडून मिळेपर्यंत मृतदेह न हलविण्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात यांनी मध्यस्थी करून आमदार मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून पालिका प्रशासनाला तसे पत्र देण्यास भाग पाडले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पालिका प्रशासन पाठपुरावा करणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
मृतदेह उकरणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
By admin | Published: August 23, 2016 5:42 AM