ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 1 - नायगाव परिसरात राहणा-या सर्पमित्राचा कोब्राच्या दंशाने मृत्यू झाला आहे. मोहम्मद अवेझ मिस्त्री असं त्याचं नाव आहे. श्रमसाफल्य इमारतीत साप दिसल्याचं कळल्यानंतर त्याला पकडण्यासाठी अवेझ गेला होता. मात्र कोब्राला पकडत असताना त्याने अवेझच्या हातावर चावा घेतला. यानंतरही अवेझने त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आणि गोणीत भरलं.
अवेझ गोणी पाठिवर घेऊन जात असताना कोब्राने त्याच्या पाठीवरही चावा घेतला. सराईत असलेल्या अवेझने यानंतरही संयम ठेवत त्याला पकडून ठेवलं आणि खाडीत सोडून दिलं. यानंतर अवेझने उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कोब्राच्या दंशाने त्याच्या शरीरात 90 टक्के विष परसलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
अवेझ आठ वर्षाचा असल्यापासून साप पकडत आला आहे. त्याला साप पकडण्याचा छंद होता. एक सराईत सर्पमित्र म्हणून त्याची ओळख झाली होती. त्यामुळेच कुठेही साप दिसला तरी त्याला लगेच फोन येत असे. त्याने अनेक विषारी सापांना पकडून जंगलात सोडलं होतं. विशेष म्हणजे साप पकडण्यासाठी त्याला कोणत्याही हत्याराची गरज भासत नव्हती. दोन महिन्यांपूर्वीही त्याला अशाच प्रकारे साप चावला होता, पण त्यातून तो बचावला होता.