ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.31 - प्रेमसंबंधात अडथळा ठरणा-या पत्नी, मुलगी आणि आईची हत्या करुन शेजारी राहणा-या वृद्धाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़.वाय. लाडेकर यांनी एकाला फाशीची शिक्षा ठोठावली़ न्यायालयाने त्याला २० हजार रुपये दंड ठोठावला असून अत्यंत थंड डोक्याने त्याने हे खुन केल्याचे नमुद केले आहे.
विश्वजित केरबा मसलकर (वय ३०, रा़ चंपारत्न सोसायटी, उदयबाग, घोरपडी) असे त्याचे नाव आहे़ ही घटना ४ आॅक्टोंबर २०१२ रोजी घडली होती़. आई शोभा (वय ५०), पत्नी अर्चना (वय २५), मुलगी किमया मसलकर(वय अडीच वर्षे) यांचा त्याने राहत्या घरी खुुन केला होता.
मसलकर याने सुरुवातीला घरात चोरी झाल्याचा बनाव रचला होता. तशी फिर्यादही त्याने वानवडी पोलिसांकडे दिली होती़ पण,पोलिसांनी केलेला तपास आणि प्रत्यक्ष तो सांगत असलेली हकिकत यात विसंगती दिसत असल्यावर केलेल्या चौकशीत त्याने आपणच खुन केल्याची कबुली दिली़ या खटल्यात मुख्य सरकारी वकील उज्वला पवार यांनी १६ साक्षीदार तपासले़ त्यातील आरोपीची प्रेयसी, जखमी मधुसुदन कुलकर्णी आणि तपास अधिकारी बाजीराव मोहिते यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. विश्वजित याने अत्यंत थंड डोक्याने केलेला हा निघृण खून असून त्याने आपल्या स्वाथार्साठी तीन जणांचा निघृण केला आहे तर एका वयोवृध्द नागरिकाच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा देणेच योग्य ठरेल असा युक्तीवाद उज्वला पवार यांनी केला़ न्यायालयाने तो ग्राह्य धरुन खुन केल्याबद्दल फाशीची शिक्षा आणि शेजारी राहणाºयांचा खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
विश्वजित मसलकर हा खासगी कंपनीत साईट मॅनेजर म्हणून काम करीत होता़ त्याने प्रथम फिर्याद देताना सांगितले की, मित्राचे लग्न असल्याने आपण सुट्टी घेतली होती़ दुपारी साडेतीन वाजता लग्नासाठी गेलो़ तेथून सायंकाळी आॅफिसला गेलो़ सायंकाळी साडेसात वाजता घरी आल्यावर हा प्रकार झाल्याचे समजले. घरातील ३ लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे त्याने फिर्यादीत सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात मात्र, अनेक विसंगती आढळून आली़ त्याचे २ वर्षांपासून एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तिच्याशी तो लग्नही करणार होता. त्याला आई,पत्नी यांचा विरोध होता़ त्यामुळे त्यांचा कायमचा काटा काढावा, म्हणून त्याने घरातील हातोड्याने पत्नी अर्चना व आई शोभा यांच्या डोक्यात वार करुन त्यांना जीवे मारले़ त्यानंतर त्याने मुलगी किमया हिच्या तोंडावर उशी दाबून तिलाही मारले. त्यानंतर घरातील हा आवाज ऐकल्याने आपले बिंग बाहेर पडू नये, म्हणून शेजारी राहणा-या मधुसुदन कुलकर्णी यांच्या घरात जाऊन त्यांच्या डोक्यावर पाठीमागून हातोड्याने मारुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:च्या घरात जबरी चोरीचा बनाव केला.
सीसीटीव्हीमुळे खरा प्रकार उघड
विश्वजीत मसलकर याने केलेला बनाव हा सुरुवातीला सर्वांनाच खरा वाटला़ पण, तो सांगतो त्यानुसार वानवडी पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यात तो लग्नासाठी गेलाच नसल्याचे दिसून आले़ त्याचवेळी त्याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो रहात असलेल्या इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीमधील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले़ सुरुवातीला त्याने आपण साडेतीन वाजता घरातून बाहेर पडल्याचे सांगितले होते. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दुपारी ३ वाजता तो इमारतीत येताना दिसतो़ त्याची आई दुपारी ३़२२ वाजता घरी आल्याचे दिसत होते तर, तो ४़२८ वाजता इमारतीमधून बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यावरुन पोलिसांना त्याच्यावर संशय वाढला व अधिक चौकशीत त्यानेच हा सर्वांचा खुन केल्याचे उघड झाले़ याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव मोहिते, पोलिस उपनिरीक्षक एस. बी. पांडे, पोलिस हवालदार पी. बी. पवार आणि पी. व्ही. धुळे यांच्या यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला आहे़