ऑनलाइन लोकमत
महागाव(यवतमाळ), दि.9 - झोपडीवजा घरात जमिनीवर झोपलेल्या चिमुकल्या बहिण-भावाला विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील टेंभी(काळी) येथे घडली. हळदीच्या उकळत्या कढईत पडून शेतकºयाच्या मृत्यू पाठोपाठ या चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अस्मिता साहेबराव धबडगावकर (६) आणि देवीदास साहेबराव धबडगावकर (५) अशी मृत बहीण-भावांची नावे आहेत. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते आपल्या घरात अंथरूण टाकून जमिनीवर झोपले होते. त्यांच्या बाजूला आईही झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अस्मिताच्या तोंडातून फेस येवू लागला. मुलीला ऊन लागले असेल, असा समज झाला. तेवढ्यातच देवीदासने उठून मांजराने चावा घेतल्याचे सांगितले. आईने लाईट लावून बघितले असता जवळच विषारी साप दिसला. त्यामुळे तिची पाचावर धारण बसली. आरडाओरडा केला तोपर्यंत अस्मिताचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. देवीदासला तातडीने फुलसावंगीमार्गे टाकळी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी या भावंडांचे वडील आपल्या सासºयाची प्रकृती बरी नसल्याने त्यांना घेवून वर्धेला गेले होते. घरी मुले आणि आई लक्ष्मीबाईच होत्या.
दोन चिमुकल्यांचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याचे पाहून आईचा आक्रोश आस्मान भेदून टाकणारा होता. दरम्यान, या दोनही बालकांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रविवार हा सुटीचा दिवस असल्याने कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे दुपारी ३ वाजता या भावंडांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर टेंभी येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, शुक्रवारी याच गावातील शेतकरी सतीश गणेश मस्के याचा हळदीच्या उकळत्या कढईत पडून मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ या दोन भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी गावकºयांच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या होत्या. साहेबराव धबडगावकर यांना तीन मुली आणि एक मुलगा असून त्यापैकी देवीदास आणि अस्मिताचा सर्पदंशाने मृत्यू झाला. पूर्णपणे खचलेल्या या परिवाराला सावरण्यासाठी गावकरी धावून गेले आहे.