ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २४ - म्हारळ येथे उल्लास नदीत बुडून ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकालच्या वेळी घडली, मृता मध्ये आजोबासह २ नातवांचा समावेश आहे. नदीपात्रात नातवंडे बुडत असल्याचे पाहून पोहता न येणाऱ्या आजोबांनीही नदीत उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरल्याने नातवांसह त्यांचाही बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कल्याणनजीक वरप गावात घडली. दीपनारायण सिंग (५४) यांच्यासह आयुष संजय सिंग (१२) आणि अर्जुन संजय सिंग (१०) अशी मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत. उल्हासनगर येथील कमला नेहरूनगर धोबीघाट परिसरात राहणारे दीपनारायण हे नातवंडे आणि त्यांच्या मित्रांसमवेत सीमा रिसॉर्टच्या मागील बाजूस असलेल्या उल्हास नदीकिनारी फिरायला गेले होते. या वेळी आयुष आणि अर्जुन हे दोन्ही सख्खे भाऊ आणि त्यांचा मित्र मनीष सिंग असे तिघे नदीपात्रात खेळायला उतरले. परंतु, पोहता येत नसल्याने ते तिघेही बुडू लागले. हा प्रकार नदीच्या काठावर बसलेल्या दीपनारायण यांनी पाहिला आणि त्यांनी तिघांना वाचविण्यासाठी स्वत: नदीत उडी घेतली. या वेळी काठावर असलेल्या शुभम सिंग यानेही त्यांच्यासोबत उडी मारली. मनीषला वाचविण्यात शुभमला यश आले. पण, त्यालाही पोहता येत नसल्याने त्याने अधिक धाडस न करता मदतीसाठी धावाधाव सुरू केली. त्यांच्या मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. पण, तिघांनाही वाचविण्यात यश आले नाही. दीपनारायण यांनाही पोहता येत नसल्याने तेही बुडाले आणि नातवंडे तर वाचली नाहीतच, पण त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आजोबांनाही प्राण गमवावे लागले. अखेर तिघांचे मृतदेह बाहेर काढून ते उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची नोंद टिटवाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने कमला नेहरूनगर परिसरावर शोककळा पसरली. मरण पावलेले आयुष आणि अर्जुन हे दोघेही सेंच्युरी रेयॉन शाळेत अनुक्रमे सातवी आणि पाचवीत शिकत होते. विशेष सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामाला असलेले दीपनारायण यांनी नुकतीच म्हणजे १६ जानेवारीला स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.