मुंबई : रिंगवेलमध्ये पडून दोघा कामगारांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना रविवारी येथे घडली. वसंत गोपाळ जावळे (५०), बाळू जावळे (४०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. दोघेही गिरगाव चौपाटीच्या नाक्यावर दैनंदिन मजुरीच्या प्रतीक्षेत उभे राहणारे नाकाकामगार होते.दक्षिण मुंबईतील फणसवाडी परिसर येथील जवाहर मेन्शन सोसायटीतील पाण्याच्या टाकीत रिंगवेलमधील पाणी चढत नव्हते. त्यामुळे रविवारी सोसायटीने खासगी ठेकेदार सहदेव बडपे (७०) यांच्याकडे रिंगवेलच्या सफाईचे काम सोपविले. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता त्यांचे ४ खासगी मजूर रिंगवेलच्या सफाईसाठी उतरले. त्यानंतर रिंगवेलमधील मोटार बाहेर काढण्यात आली. आतील गाळ सुकल्यानंतर खाली उतरणे सोयीचे ठरेल, म्हणून तेही बाहेर पडले. दरम्यान, १२च्या सुमारास यातील वसंत (रा. गिरगाव) हे खाली उतरले. मात्र आधारासाठी घेतलेली दोरी सुटल्याने ते २० फूट खोल खाली कोसळले. त्यांच्या बचावासाठी बाळू (रा. माटुंगा) यांनी रिंगवेलमध्ये उडी घेतली. मात्र सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याने दोघांचाही मृत्यू झाला. (प्रतिनिधी)> सुरक्षेची काळजी घेतली नाही : रिंगवेलमध्ये उतरविण्यापूर्वी दोरखंड, हेल्मेट, आॅक्सिजन मास्कसहित सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक साहित्य मजुरांना पुरविणे गरजेचे होते. कुठल्याही प्रकारे सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे मजुरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एल.टी. मार्ग पोलिसांनी सांगितले. त्यात संबंधित कर्मचारी वर्गासह सोसायटीतील रहिवाशांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. ठेकेदाराने सोसायटीतील रहिवाशांना घटनेची माहिती दिली तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविण्यात आले. साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल होत बचावकार्यास सुरुवात केली. तब्बल अर्ध्या तासाने दोघांनाही बाहेर काढून तत्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
रिंगवेलमध्ये पडून दोघा नाकाकामगारांचा मृत्यू
By admin | Published: March 07, 2016 4:00 AM