मुंबई : मडगावहून सीएसटी स्थानकात आल्यानंतर या स्थानकातील विश्रांती कक्षात वास्तव्यास असणाऱ्या एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली होती. या महिलेचा मृत्यू विषबाधेमुळे की विश्रांती कक्षात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे झाला, याबाबत सीएसटी रेल्वे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या महिलेसोबत असणाऱ्या तिच्या पतीलाही त्रास होत असून सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये राहणारे नाझिया (२८) आणि जियाऊर रहमान (३२) हे २२ एप्रिल रोजी मडगाव एक्स्प्रेसने मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सीएसटी स्थानकातील विश्रांती कक्षाचे आरक्षण केले. या जोडप्याने एक्स्प्रेसमधून जेवणासाठी बिर्याणी घेतली आणि त्यानंतरच हे जोडपे आरक्षित विश्रांती कक्षात गेले. विश्रांती कक्षात बसून या दोघांनीही बिर्याणी खाल्ली. थोड्या वेळाने या दोघांनाही गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने खोली बदलण्याची मागणी त्यांनी रेल्वेच्या मदतनीसाकडे केली. त्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना दुसरी खोली देण्यात आली. दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास या जोडप्यांना मळमळणे आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.
रेल्वेच्या विश्रांती कक्षात महिला प्रवाशाचा मृत्यू
By admin | Published: April 26, 2016 6:07 AM