ऑनलाइन लोकमत
मुंबई/ठाणे, दि. ६ - राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह असला तरी या उत्साहाला अपघाताचे गालबोट लागले आहे. ठाण्यातील भिवंडी तालुक्यात दहीहंडी बांधताना लोखंडी खांब डोक्यात पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भिवंडी तालुक्यातील दिघोशी गावात दहीहंडी बांधली जात होती. दहीहंडीच्या दोरीचा एक टोक झाडाला तर दुसरे टोक लोखंडी खांबाला बांधले जात होते. मात्र या दरम्यान हा लोखंडी खांब खाली कोसळला व गणेश पाटील नामक तरुणाच्या डोक्यावर पडला. या अपघातात गणेश पाटीलचा मृत्यू झाला. गणेश पाटीलचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याला दोन महिन्याचे बाळ आहे.
दरम्या,मुंबईतील दहीहंडी उत्सवातही गोविदांची जखमी होण्याच्या घटना सुरुच आहेत. मुंबईत विविध ठिकाणी थर कोसळल्याने आत्तापर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. यातील २२ जणांवर केईएम तर २ जणांवर शीव रुग्णालयात उपचार करण्यात आले. १३ गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे समजते.