मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ आज म्हणजेच 30 नोव्हेंबरला संपला आहे. त्यामुळे आता राज्याचे मुख्य सचिव म्हणून निजोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakrabarty) यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आज सिताराम कुंटे यांनी देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे कार्यभार सोपवला आहे.
राज्याचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. पण सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारने मंजूर केला नाही. त्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. देबाशिष चक्रवर्ती हे १९८६ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
दरम्यान, मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर देबाशिष चक्रवर्ती आहेत. पण, देबाशिष चक्रवर्तींच्या नावाची शिफारस मुख्य सचिवपदी होण्याची शक्यता कमी होती. कारण त्यांचा कार्यकाळही फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. मात्र, आता त्यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागारपदी नियुक्तीराज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.
राज्य सरकारकडून सीताराम कुंटेंच्या मुदतवाढीचा प्रस्तावसीताराम कुंटे हे 1985 च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. सीताराम कुंटे यांनी राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे संकट असताना चोख कामगिरी बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक असे सीताराम कुंटे आहेत. त्यांचा कार्यकाळ आज म्हणजेच 30 नोव्हेंबरला संपला आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांना राज्याचे मुख्य सचिव म्हणून आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. पण सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारने मंजूर केला नाही.