जामखेड (अहमदनगर) : भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवरून अरणगाव (ता. जामखेड) येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. रिव्हॉल्व्हर, गज, काठ्यांचा त्यात वापर झाला. विद्यमान सरपंच जनाबाई शिंदे यांचा मुलगा व माजी सरपंच संतोष निगुडे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण होऊन त्यात चार जण जखमी झाले. जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एकूण ३२ जणांविरुद्ध दरोडा, मारामारी व शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीचे १३ व भाजपाच्या १९ कार्यकर्त्यांविरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. हॉटेलच्या मोडतोड प्रकरणी सरपंचांची मुले व त्यांचे समर्थक अशा दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. एकूण तीन निरनिराळ्या गुन्ह्यांत ४२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2016 1:38 AM