पुणे : ‘मराठी बालकुमार साहित्य संस्था’ नावाने स्वत:ची वेगळी चूल मांडणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून या नवीन संस्थेचा ‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था’ या जुन्या संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे एकीकडे सांगितले जात आहे. मात्र, जुन्याच संस्थेच्या घटना समितीने तयार केलेल्या घटनेच्या बळावर नवीन संस्था स्थापन करण्याबरोबरच लेटरपॅडवर एका सदस्याच्या सहीने दि. ६ नोव्हेंबर रोजी आजीव सभासदांची बैठक बोलविण्याचा प्रकार काही पदाधिकाऱ्यांनीच उघडकीस आणला आहे. ही बैठक अनधिकृत असून, या माध्यमातून आजीव सभासदांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्याध्यक्ष नवीन इंदलकर आणि कार्यवाह सुनील महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला . संस्थेच्या लेटरपॅडचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांना पत्र देण्याबरोबरच जुन्या संस्थेचा संपूर्ण लेखाजोखा पंधरा दिवसांच्या आत सादर करावा आणि ही बैठक रद्द करावी, असे पत्र जुन्या संस्थेचे कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांना पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी चंद्रकांत इंदोरे, मुकुंद तेलीचरी आणि माधव राजगुरू उपस्थित होते. जुन्या संस्थेचे भवितव्य अद्यापही अधांतरीच आहे. संस्था पुढे चालू ठेवणे आता अवघड आहे, असे सांगत तांत्रिक अडचणीत अडकलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पदाधिकारी व सदस्याने नवीन संस्था स्थापन केली. या नव्या संस्थेची माहिती देण्यासाठी येत्या ६ नोव्हेंबर आजीव सभासदांची बैठक त्यांनी बोलाविली आहे. या बैठकीवरच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याविषयी सुनील महाजन म्हणाले, की यापूर्वीच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था विसर्जित करण्यात आली आहे. परंतु, संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण संस्थेने मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणे संस्थेची नवीन घटना करण्यासाठी समिती नेमण्यात आली, यामध्ये डॉ. वि. वि. घाणेकर, माधव राजगुरू, मुकुंद तेलीचरी, राजेश कुलकर्णी, मिहीर थत्ते, नंदकुमार लेव्हेकर यांचा समावेश होता. घटना समितीने घटना दुरुस्ती करून हा अहवाल संस्थेचे काम पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सादर केला; मात्र समितीच्या या सर्व बैठकांना मिहीर थत्ते आणि नंदकुमार लव्हेकर अनुपस्थित होते. याच घटनेचाच गैरवापर करून कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी दुसरी संस्था स्थापन केली असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, संस्थेचे कार्यवाह अनिल कुलकर्णी यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन नवीन संस्था स्थापन केल्याचे सांगितले होते. काहीशा तांत्रिक अडचणींमुळे पूर्वीच्या संस्थेचे पुनरुज्जीवन होऊ शकलेले नाही. यामुळे बालसाहित्य चळवळ ठप्प झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘मराठी बालकुमार साहित्य संस्था’ या नावाने नवीन संस्थेची धर्मादाय कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. जुन्या संस्थेशी या संस्थेचा काही संबंध राहणार नाही. बालसाहित्य चळवळीसाठी आवश्यक ते सर्व कार्य ही संस्था करेल, असे त्यांनी सांगितले होते. (प्रतिनिधी)>नव्या संस्थेबाबत दिली नाही कल्पनाया नवीन संस्थेबाबत कोषाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना कोणतीच पूर्वकल्पना दिली नाही. आजही जुन्या संस्थेची सर्व कागदपत्रे, इतिवृत्त, पावती पुस्तके, चेकबुक, बँकेचे पासबुक, लेटरपॅड, शिक्के, संस्थेचा पत्रव्यवहार फाईल आदी सर्व कागदपत्रे कोषाध्यक्षांच्या घरच्या पत्त्यावर आहेत. ज्याचा अधिकार नाही, अशा मिहीर थत्तेसारख्या एका सदस्याच्या सहीने जुन्याच लेटरपॅडचा वापर करून दि. ६नोव्हेंबरची बैठक बोलावण्याची गंभीर चूक घडली आहे. कोषाध्यक्ष आजीव सदस्यांची अशाप्रकारे फसवणूक करीत असल्याचा आरोप सुनील महाजन यांनी केला आहे.
बालकुमार साहित्य संस्थेतील वाद
By admin | Published: November 04, 2016 1:12 AM