केंदूर : येथील थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्यावरून केंदूर व पाबळ या दोन गावांत वाद उभा राहिलेला आहे. या पाण्यावर दोन्ही गावे हक्क दाखवू लागली आहेत. केंदूर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी वेळ नदीवरील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी या भागातील पऱ्हाडवाडी, शिळकवाडी, माळीमळा, तवलीबेंद येथील शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार, मंगळवारी (दि. १७) पाणी सोडण्यात आले होते; मात्र पाबळ येथील काही ग्रामस्थांनी येऊन अवघ्या काही वेळातच ते बंद केले. येथील शेतकरी बाळासाहेब साकोरे, शांताराम खुर्पे, ईश्वर गायकवाड, तात्याभाऊ साकोरे, सुदाम ताठे व ग्रामस्थांनी वरिष्ठांची नुकतीच भेट घेतली. त्यानुसार, वरिष्ठ अधिकारी गौतम लोंढे यांनी प्रत्यक्ष येण्याचे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना दिले होते; मात्र आज दिवसभर येथील सुमारे १०० शेतकरी थिटेवाडी बंधाऱ्यावर बसूनही कोणताच अधिकरी तेथे आला नाही.थिटेवाडी बंधाऱ्याचे सुरुवातीला संपूर्ण अधिकार जलसंधारण विभागाकडे देण्यात आले होते; मात्र आता हा संपूर्ण अधिकार चासकमान लघु पाटबंधारे विभागाकडे देण्यात आलेला आहे. याबाबात संबंधित अधिकारी एस. बी. मेमाणे यांच्याकडून माहिती घेतली असता, थिटेवाडी बंधाऱ्यातून कालव्यासाठी दोन आवर्तने देण्यात आलेली होती. तसेच, वेळ नदीवरील बंधाऱ्यासाठी एक आवर्तनही देण्यात आलेले होते. त्यामुळे राखीव साठा ही फक्त पिण्यासाठीच ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. या वेळी केदूर परिसरातील वेळ नदीवरील शेतकरी आक्रमक झालेले आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठा शिल्लक असूनही पाणी सोडले जात नाही. त्यामुळे अवघे काही बंधारे भरण्यासाठी पाणी मागण्यात येत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, दि. १७ रोजी बंधारे भण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तोंडी पाणी सोडण्याचे आदेश ग्रामस्थांसमोरे कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले होते. त्या वेळी केंदूरच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र, अवघ्या काही क्षणांतच पाणी बंद करण्यात आल्यामुळे अधिकच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणी सोडले गेले नसल्यास आम्हालाच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)>प्रत्येक ठिकाणी पाणीवाटप संस्था स्थापन केंदूर परिसरातील वेळ नदीवर सुमारे ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, प्रत्येक ठिकाणी पाणीवाटप संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, सध्या पाचच बंधाऱ्यांच्या लोकांनी मागणी केली असतानाही ते सोडले जात नाही. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, पाणी ४ ते ५ फूट शिल्लक असतानाही सोडले जात नाही. अवघ्या एका फुटाच्या पाण्यावरच सर्वच बंधारे पूर्ण भरले जाणार आहेत.
पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद
By admin | Published: January 20, 2017 12:49 AM