ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 03 - ' भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान असलेल्या तणावाचे मूळ कारण दहशतवाद नसून काश्मीरचा न सुटलेला प्रश्न हेच या समस्येचे मूळ आहे' असे मत भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. दोन्ही देशांदरम्यान असलेला हा तणाव खरंच दहशतवादामुळे आहे का? याचा विचार व्हावा असेही बासित म्हणाले. ' चर्चेने शांतता प्रस्थापित होऊ शकते, पण चर्चा झाली की काश्मीरप्रश्न, दहशतवाद दूर होईल असे कुणी म्हणत नाही' असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दोन्ही देशांदरम्यान संबंध सुधारत असताना राजदूतांनी मौलिक भूमिका बजावण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही अब्दुल बासित यांनी केलं. भारत-पाक संबंध तुटता तुटत नाहीत आणि दोन्ही देश सोबतही राहत नाहीत. दोन्ही देशांना 5 पावले पुढे टाकणं आणि 10 पावलं मागे जाणं सोडून चर्चेला सामोरं जाण्याची गरज आहे. पाक स्वतंत्र झाला तेव्हा काही काळाने दोन्ही देश एकत्र येतील, असे अनेकांना वाटायचे.
मात्र ती आशा फोल ठरली आहे. तसेच एकेकाळी पाकची प्रगती भारत चीनपेक्षा वेगवान होती. पण दहशतवादाने आमचे नुकसान केले. गेल्या 69 वर्षांत अनेक आव्हाने असून पाकिस्तानला जगात स्थान निर्माण करायचं आहे, असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले आहेत. 1979 नंतर अफगाणिस्तानमुळे पाकने खूप काही गमावले असून, त्याकाळी आमच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला होता, असं अब्दुल बासित म्हणाले आहेत.
अब्दुल बासित यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- पाकिस्तानची आर्मी शांतता चर्चेच्या विरोधात असल्याचा समज, मात्र तो योग्य नाही
- भारत-चीन आणि भारत-पाक या देशांच्या सीमेचा वाद वेगवेगळा
- हुर्रियस कॉन्फरन्सच्या मुद्द्यावर बोलणार नाही
- भारत-पाकिस्तानसाठी काश्मीर हा महत्त्वाचा मुद्दा
- अफगाणिस्तानच्या पाइपलाइन प्रोजेक्टवरून वाद, मात्र आमचे अफगाणिस्तानशी चांगले संबंध
- सोव्हिएत युनियनने अफगाणवर हल्ला केला, तरी आमच्यावर टीका होते
- 9/11च्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात कारवाई सुरुवात केली
- पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याचं बोललं जातं. मात्र 9/11च्या हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाचा सहभाग नव्हता
- काश्मीरवरूनच ब-यात भारत-पाकमध्ये वाद होतात
- भारत-पाकनं अनेक करार केले. मात्र काश्मीरवर अजूनही समाधानकारक तोडगा निघाला नाही
- शक्तीचा उपयोग करून शांती प्रस्थापित होऊ शकत नाही,युद्धामुळे नव्या समस्या निर्माण होतात
- अफगाणिस्तानात पुन्हा गृहयुद्ध भडकण्याची भीती
- भारतासोबत संबंध सुधारावे यासाठी प्रतीक्षा करू शकतो,पण अफगानिस्तानची समस्या दूर करण्यावर भर आहे
- शांती हेच आपले लक्ष्य. हे संबंध आपल्यासाठी महत्वाचे, प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर नक्की यश मिळेल
- व्हिसाची संख्या वाढवली जाऊ शकते, दळणवळण सुविधा खराब ती सुधारली पाहिजे.
- पाकिस्तानी मालिका, चित्रपट इथे भारतात दाखवले गेले पाहिजेत. या लहान लहान पुढाकारातून सकारात्मक वातावरण निर्मिती होते
- भारतात काहीही दुर्घटना झाली की थेट निष्कर्ष तयार करण्यात येतात, असे होऊ नये. आम्हीसुद्धा दहशतवादविरोधात आहोत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी - नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली होती, मात्र पठाणकोटमुळे त्यात अडथळे आले.
- पठाणकोट हल्ल्यावरची प्रतिक्रिया मुंबईतल्या हल्ल्याएवढी तीव्र नव्हती, त्यामुळे संबंध सुधारतील ही आशा कायम