चिपळूण (रत्नागिरी) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडील इंजिनीयरिंग पदवीवरुन वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या सरकारी मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी आपण या विद्यापीठातून घेतलेली पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी आहे. आजतागायत आपण या पदवीचा फायदा घेऊन कोणत्याही प्रकारचा सरकारी लाभ अथवा नोकरी मिळवलेली नाही, असे सामंत यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारमध्ये तंत्रशिक्षण खात्याचे मंत्रीपद मिळवलेल्या सामंत यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून आॅटोमोबाईल इंजिनिअरींगचा डिप्लोमा केल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मात्र, या विद्यापीठाला सरकारी मान्यता नसल्याचा आरोप करत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरदास यांनी सामंत यांची पदवी बोगस असल्याचा आरोप केला आहे.याबाबत सामंत म्हणाले की, आपण १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी घेतली. आपल्या वैयक्तिक ज्ञानात भर पडावी यासाठीच ही पदवी घेतली. ज्या व्यक्तीने आपल्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला त्याचे तितकेच धन्यवाद मानावेसे वाटतात. कारण त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत आपले काम राज्यभरात पोहोचवण्यासाठी एकप्रकारे मदत केली.
मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 4:47 AM