पुणे : प्रभागांची रचना करताना गोखलेनगरच्या भागाचे अनेक तुकडे करून वेगवेगळ््या प्रभागांना जोडले गेल्याने त्याची रचना पंख्यासारखी झाली आहे. त्याचबरोबर औंध-बोपोडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी, कसबा पेठ- सोमवार पेठ प्रभागांची मोडतोड झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रभागांची सलगता राखली गेलेली नाही.महापालिका निवडणुकीसाठी ४ चे प्रभाग करताना काही प्रभागांची रचना मोठी विचित्र झाली आहे. पुणे विद्यापीठ वाकडेवाडी प्रभाग क्रमांक ७ चे एक टोक खडकी कॅन्टोन्मेंटच्या सीमेवर आहे, तर दुसरे टोक गोखलेनगरच्या बारामती हॉस्टेल येथे आहे. औंध-बोपोडीचा प्रभाग करताना खडकी कॅन्टोन्मेंट ओलांडून त्याला वाकडेवाडीचा काही भाग जोडला गेला आहे. गोखलेनगर परिसराचा एक तुकडा सावित्रीबाई फुले विद्यापीठ-वाकडेवाडी भागाला जोडला गेला आहे, तर दुसरा भाग डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी भागाला जोडला आहे. त्यामुळे तिथल्या विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे. या प्रभागात शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, ब्रेमेन चौक, साखर संकुल, भय्यावाडी आदी परिसराचा समावेश करण्यात आला आहे. गोखलेनगरचा दुसरा तुकडा हनुमाननगर, वडारवाडी, कमला नेहरू पार्क हा आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौकापर्यंत वाढलेला आहे. त्याचबरोबर एसएम जोशी पुलापर्यंत त्याची हद्द पसरलेली आहे.कसबा पेठ-सोमवार पेठ हा १६ नंबरचा प्रभागही वेड्यावाकड्या पद्धतीने बनविण्यात आला आहे. लक्ष्मी रस्ताही या प्रभागाची सीमा मानणे आवश्यक असताना गल्लीबोळातून त्याचे तुकडे पाडण्यात आले आहेत. वडगावशेरी प्रभागातही नगररस्ता ही सीमा धरणे आवश्यकता असताना नगररस्ता ओलांडून वडगाव शेरीच्या प्रभागाला कल्याणीनगरचा भाग जोडला गेला आहे. प्रभागांची मोडतोड विशिष्ट मतदाराला जोडून घेण्यासाठी किंवा प्रबळ असलेल्या उमेदवाराचे खच्चीकरण करण्यासाठी करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक अडचणीत आले आहेत. या प्रभागरचनेविरुद्ध मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. >काही पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षितमहापालिकेतील राजकीय पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मात्र एकमेकांच्या विरोधात लढावे लागणार नाही, यादृष्टीने प्रभागांची रचना करून घेतली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी वजन वापरून त्यांचे प्रभाग सुरक्षित करून घेतले असल्याचे बोलले जात आहे.
प्रभागरचनेत मोडतोड
By admin | Published: October 08, 2016 12:39 AM