मुंबई : राज्य सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ते पुन्हा कर्जच काढू नयेत, अशी स्थिती करायची आहे. त्यासाठी शेती क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका विशद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ असा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केला आहे. फडणवीस यांनी या माध्यमातून थेट शेतकऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. या कार्यक्रमाचे आकाशवाणी व दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनी’वरून सोमवारी प्रसारण केले जाणार आहे. कर्जमाफीमुळे राजकीय फायदा होईल, पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी काही निवडक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मांडली. शेती क्षेत्रातील उत्पादन क्षमतेबद्दल खंत व्यक्त करत ते म्हणाले की, उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) दलालांची साखळीच संपुष्टात येईलनाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण आहे. फळांवर प्रक्रिया केली, तर त्यांना अधिक भाव मिळेल. राज्य सरकारने भाज्या, फळांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. शिवाय, महापालिकांनाही शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो. चांगला माल व किफायतशीर दरात भाज्या व फळे मिळत असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल. जलयुक्त शिवार ही जनतेची योजना आहे. जनतेच्या सक्रिय सहभागामुळे ही योजना यशस्वी झाली. जर जनतेने यात सहभागच नोंदवला नसता, तर एवढे मोठे परिवर्तन झालेच नसते. या कामांमुळे अनेक ठिकाणी टँकरचीही गरज भासली नाही. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग व आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव असल्याचे ते म्हणाले.सरकार समूहशेतीला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी समूह शेतीसाठी जास्तीत जास्त सवलती व विविध योजना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी, अशी स्थिती आहे. यात बदल व्हायला हवा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत
By admin | Published: April 10, 2017 4:43 AM