लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड/परभणी/हिंगोली : आम्ही इंगा दाखविल्यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला़ परंतु त्याचे श्रेय शिवसेना घेणार नाही़ कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाला असला तरी, शेतकरी कर्जमुक्त झाला नाही़ त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आम्ही सरकारला सोडणार नसून कर्जमुक्ती २०१६ नव्हे तर जून २०१७पर्यंत हवी, अशी आग्रही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे गुरुवारी नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्याचा दौरा केला. नांदेडात आयोजित मेळाव्यात ते म्हणाले, विरोधी पक्षात असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेना रस्त्यावर होती़ आज सत्तेत असतानाही शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सेना रस्त्यावर उतरत आहे़ कारण आम्हाला खुर्चीचा मोह नाही़ खुर्ची येते अन् जाते़ परंतु तुमचे-आमचे नाते कायम टिकले पाहिजे़विरोधकांकडून संघर्ष यात्रा काढण्यात आली़ वातानुकुलित गाडीतून फिरत-फिरत त्यांनी संघर्ष केला़ दुसरीकडे शेतकऱ्यांबाबत ‘कर्जमाफी मागण्याची फॅशन झाली’, ‘रडतात साले’ अशी वक्तव्ये करणारे मंत्री ज्या पक्षात आहेत, तो पक्ष कधी कर्जमाफीचा निर्णय घेईल असे वाटते का? कर्जमाफी ही शेतकऱ्यांनी मिळविली आहे़ त्यामुळे त्याचे श्रेय कुणीही घेऊ नये, असे सांगून, जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक घरी जाणार नाही, असाही इशारा ठाकरे यांनी दिला़ यावेळी शिवसेनेचे सचिव खा़ विनायक राऊत, खा़ चंद्रकांत खैरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर आदींची उपस्थिती होती़
कर्जमुक्ती २०१७ पर्यंत हवी
By admin | Published: June 30, 2017 1:19 AM