ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.04 - विदर्भात गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ व त्यामुळे शेतकºयांवरील थकलेले कर्ज, थकीत वीज बिल यामुळे वैदर्भीय शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. अशा शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सहकारी क्षेत्रातील संपूर्ण पीक कर्ज माफ केल्याची घोषणा प्रतिरूप सरकारचे मुख्यमंत्री अॅड. वामनराव चटप यांनी मंगळवारी प्रतिरूप विधानसभेत केली.
देशपांडे सभागृहात आयोजित प्रतिरूप विधानसभेच्या दुसºया आणि शेवटच्या दिवशी लक्षवेधी सूचनेद्वारा विरोधी पक्षनेते राम नेवले, नीळकंठराव कोरांगे, तुषार हट्टेवार, मनोज तायडे, नंदकुमार खेरडे, दामोधर शर्मा, तेजराव मुंढे, तुळशीराम गेडाम, रघुनाथ तलांडे आदी सदस्यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीचा विषय लावून धरला. या विषयावर विरोधी पक्षनेत्यांसह एकूणच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रतिरूप सरकारचे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला याप्रकरणी आठवडाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पंरतु विरोधी पक्षातील सदस्यांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. यामुळे अध्यक्षांना कामकाज चालवणे कठीण झाले. त्यामुळे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेंबुर्डे यांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. दरम्यान सभागृहाबाहेर शेतकºयांच्याच प्रश्नांवर मोर्चा आला. त्या मोर्चालाही मुख्यमंत्री चटप सामोरे गेले.