मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार असून येत्या एप्रिलपर्यंत ही योजना पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जाहीर केले.पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्याच्या दोन गावांमधील लाभार्थींची नावे असतील. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होईल. आतापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांची नावे या योजनेसाठी आली आहेत. त्यांची कागदपत्रे तपासून निकषात बसणाऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. सगळ्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आधीच्या सरकारमध्येही मी सातत्याने या लाभार्थींची नावे जाहीर करा, अशी भूमिका घेतली होती, पण ती दिली नव्हती म्हणून आम्ही आधी नावे जाहीर करीत आहोत. आमच्या योजनेत पूर्ण पारदर्शकता असेल. सरकारमध्ये येताच आम्ही योजना जाहीर केली व आता अंमलबजावणी करीत आहोत. आधीच्या सरकारने त्यासाठी सात महिने घेतले होते. ती योजना अजूनपर्यंत सुरू होती, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.तूर खरेदीत सरकारने चालढकल चालविल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा पवार यांनी इन्कार केला. आतापर्यंत ३०६ केंद्रांवर ६२ हजार ६९० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. तरीही विरोधकांनी पुरावे द्यावेत, आम्ही चौकशी करू, असे आव्हान अजित पवार यांनी दिले.
कर्जमाफीसाठी ३५ लाख शेतकऱ्यांचे अर्ज, लाभार्थींची पहिली यादी आज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:52 AM