मुंबई - महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रत्येकी एका गावाची कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत वर्णी लावण्यात आली आहे. दोन्ही मंत्री शिवसेनेचे नेते आहेत.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजने अंतर्गत कॅबिनेटमंत्री संदीपान भूमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातील गावांची कर्जमाफी झाली आहे. भुमरे यांच्या पैठण मतदार संघातील पातोड बु. या गावाचा कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. येथील 242 सदस्यांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त सत्तार यांच्या सिल्लोड गावातील 582 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत मंत्र्यांच्याच गावांचा समावेश करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाचा समावेश असेल. तसेच अल्पमुदत पीककर्जाचा पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकीची परतफेड न केलेल्या रकमेचा समावेश असेल. त्यात दोन लाखांपेक्षा कमी रक्कम असल्यास अशा सर्व खातेदारांना दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.