ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - कर्जमाफी देणे शक्य नाही असे म्हणणा-या सरकारला आज कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला हा शेतकरी एकजुटीचा आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा विजय आहे असं काँग्रेस खासदार अशोक चव्हाण बोलले आहेत. काँग्रेस पक्षाने रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची ही मागणी कायम आहे. तसेच ही कर्जमाफी देशातील आजतागायची सर्वात मोठी कर्जमाफी आहे असे म्हणणे ही राज्यातील जनतेची दिशाभूल आहे. काँग्रेसच्या केंद्र व राज्य सरकारने २००८ साली दिलेली कर्जमाफी अजूनही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असं अशोक चव्हाण बोलले आहेत.
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार चव्हाण म्हणले की, काँग्रेस पक्षाने सातत्याने शेतकरी कर्जमाफीचा विषय लावून धरला होता. विधानसभेत काँग्रेस पक्षाने हा विषय सातत्याने लावून धरला मात्र सरकार कर्जमाफी द्यायला तयार नव्हते त्यामुळे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढली त्याला राज्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर शेतक-यांनी पुकारलेल्या ऐतिहासीक संपामुळे सरकारवर दबाव वाढला त्यातच सरकारने काही शेतकरी नेत्यांना हाताशी धरून अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊन संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील शेतक-यांनी संप सुरुच ठेवत सरकारचा प्रयत्न हाणून पाडला. विरोधी पक्ष आणि राज्यभरातील शेतकरी संघटीत झाल्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. सरकारने कर्जमाफी दिली नाही तर शेतकरी आणि विरोधी पक्षांनी ती सरकारकडून खेचून घेतली आहे असं अशोक चव्हाण बोलले आहेत.
सरकारने १ लाख ५० हजार रूपयांची कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे दीड लाखांपेक्षा जास्त कृषीपूरक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या कर्जमाफीचा पूर्ण लाभमिळणार नाही त्यामुळे रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांची कर्ज माफ करावीत ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना २५ हजारांची मदत अत्यल्प आहे ती वाढवावी. आता खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र देऊन नविन कर्जवाटप सुरु करावे. शेतक-यांना १० हजार रूपये मदत देताना जशा जाचक अटी घातल्या आहेत तशा अटी घालून शेतक-यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवू नये. या सरकारचा पूर्वानुभव चांगला नाही. सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक राहिला आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवेल तसेच कर्जमाफी प्रत्यक्षात मिळत नाही तोवर आपला संघर्ष व सरकारवरील दबाव कायम ठेवेल, असेही अशोक चव्हाण बोलले आहेत.