अमरावती - राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उप्तादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासह केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या शरद पवार यांचा आज अमरावतीमध्ये सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले.
विविध कारणांमुळे शेतीक्षेत्रासमोरील वाढत असलेली आव्हाने, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या तसेच जून महिन्यात शेतकऱ्यांनी केलेला अभूतपूर्व संप या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. दरम्यान, आज शेतकरी कर्जमाफीबाबत शरद पवार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उप्तादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा मिळणे गरजेचे आहे."देशाचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात योगदानाचा शरद पवार यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, "आज शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. शेतमाल बाजारात आला की, भाव पाडले जातात. व्यापा-यांच्या मर्जीनुसार शेतमालाला बाजारभाव ठरविले जातात. अप्रमाणित कीटकनाशके विकली जात असतील, तर त्या कंपन्यांविरुद्ध खटले दाखल करावे. राज्य शासनाने शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे," असा सल्लाही त्यांनी शासनाला दिला. देशातील काही बड्या व्यावसायिकांनी हजारो कोटी रुपये बुडविल्याची बाब लोकसभेत चर्चेला आली होती. त्यामुळे कष्टातून अन्नधान्य पिकविणा-या बळीराजाचे थोडेफार कर्ज माफ केले असेल, तर त्यांच्यावर शासनाने उपकार केलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. समाजातील शेवटच्या माणसाच्या हितासाठी माझा अखेरचा श्वास राहील, असे शरद पवार नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी म्हणाले.शरद पवार यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले, " शरद पवार हे दिलदार विरोधक आहेत. पक्षभेद विसरून ते मागे उभे राहतात. त्यांचा शेतीचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारमध्ये सहभागी होताना त्यांनी कृषी खाते मागून घेतले." असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची निर्णय घेतानाही आपण शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेतल्याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. "राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याची गरज होती. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला. तेव्हा शरद पवार यांना दिल्लीला बोलावले. तिथे राष्ट्वादी आणि भाजपाचेही नेते उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शन केले," असे मुख्यमंत्री म्हणाले.