लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार निव्वळ आकड्यांचा खेळ करत आहे. जाचक अटी आणि शर्तींमुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, कर्जमाफीची घोषणा करताना दीड लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या ८९ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार असल्याचे वक्तव्य केले. आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३६ लाखांचा आकडा दिला आहे. राज्य सरकारकडून येणाऱ्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे भाजपाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मध्यावधीसाठी निर्णय -भाजपाच्या गोटातून मध्यावधीची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याची शंका आहे. मध्यावधीची घोषणा झाली तर काँग्रेस त्यासाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.संघाची भूमिका शेतकरीविरोधीच -संघ आणि भाजपाची भूमिका कायमच शेतकरीविरोधी राहिली आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नसला तरी तातडीचा उपाय आहे. चार वर्षांची कर्जमाफी घोषितकरून सरकारने दीर्घकालीन उपाय योजावेत, असे चव्हाण यांनी सरसंघचालकांच्या वक्तव्यासंदर्भात सांगितले.
‘कर्जमाफी निव्वळ आकड्यांचा खेळ’
By admin | Published: June 28, 2017 2:08 AM